Maharashtra Famous Picnic Spot : काल मान्सून मुंबईच्या वेशीत दाखल झाला आहे. सहा जूनला महाराष्ट्रातील तळ कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हजेरी लावल्यानंतर मान्सून आठ जूनला पुण्यात दाखल झाला. यानंतर तो अवघ्या एका दिवसात राजधानी मुंबईत आला. मुंबईच्या पुढे मान्सूनने अहमदनगर आणि मराठवाड्याच्या बीड पर्यंत मजल मारली आहे.
येत्या काही दिवसात तो संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याची शक्यता आहे. यामुळे आता राज्यात शेतीकामांना मोठा वेग आला असून पर्यटक देखील पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात पिकनिकला जाणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाची माहिती पाहणार आहोत.
खरे तर पावसाळ्यात हिरवागार निसर्ग, पांढरा शुभ्र धबधबा, दाट धुके, ओलाचिंब भिजवणारा पाऊस, पशुपक्ष्यांचा किलकिलाट अशा निसर्गरम्य ठिकाणी भेट देणे अनेकांना आवडते.
जर तुम्हीही अशाच निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यातील भांबवली वजराई हा धबधबा सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. सातारा शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भांबवली गावाजवळ हा धबधबा आहे.
हा आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा असल्याचा दावा केला जातो. 1840 फूट एवढी या धबधब्याची उंची असल्याची माहिती समोर आली आहे. येथे पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते.
या धबधब्याचे विहंगम दृश्य आपल्या नजरेत कैद करण्यासाठी राज्याबाहेरील पर्यटक देखील येथे आवर्जून भेट देतात. यामुळे जर तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात कुठे पिकनिक साठी जाणार असाल तर हा धबधबा तुम्ही नक्कीच एक्सप्लोर केला पाहिजे.
घनदाट जंगलात असणारा हा धबधबा पर्यटकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सातारा जिल्ह्यातील उरमोडी नदी हे या धबधब्याचे उगमस्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कास पठार, कास तलाव पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
याच कास तलावापासून पाच किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. येथील घनदाट जंगल, शेकडो फूट उंचीवरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा, हिरवागार निसर्ग या जागेची सुंदरता वाढवण्याचे काम करते.